Shubhangi Belgaonkar

Inspirational

4  

Shubhangi Belgaonkar

Inspirational

सेवा सूनित

सेवा सूनित

3 mins
494


आजही तिने शंभर फूट दूर उभ्या राहिलेल्या नातेवाईकांना मोठ्या जड आंतकरणाने हात हालवून सारे काही झाले असल्याची जणु पावतीच दिली. शंभर फूट दूर जाळीच्या आत उभे असलेल्या सर्वांचे हात जोडले गेले तिच्यासाठी आणि त्यांच्या गेलेल्या जवळच्या व्यक्तीसाठी. माणूस जिवंतपणी त्रास देतो एकमेकांना पण गेल्यावर नाही यावर तिचा लहानपणापासून भरवसा होता. कारण अगदी लहानपणापासून तिने तिच्या आई वडिलांना स्मशानभूमीत काम करतांना, सरण रचताना, गोवऱ्या विकताना पाहिले होते. नासिक अमरधाम, पंचवटी येथील सुनीताताई पाटील यांची ही सत्यकथा आज आपणास सांगते आहे. त्यांचे वडील आणि आई स्मशानभूमीत राहत होते. त्यांचे काम बघतच सुनीता मोठी झाली. पुढे विवाह झाल्यावर काही काळ त्या त्रंबकेश्वर येथे गेल्या पण आपण सर्वांपेक्षा काही वेगळे करायची जिद्द त्यांना शांत बसू देईना. त्या परत नासिक अमरधाममध्ये आल्या. अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या वस्तूंचे छोटे दुकान सुरू केले. रोज निरनिराळे मृतदेह त्यांच्या समोर येत असत काही अपघाताने मृत झालेले, काही जळून गेलेले, काही पाण्यात बुडून गेलेले, काही कॅन्सर ने गेलेले तर काही दीर्घ आजाराने, काही हार्टअटॅकने एक ना अनेक प्रकार मृत्यूचे आणि हजारो प्रकार मृतदेहा बरोबर येणाऱ्या नातेवाईकांचे त्यांनी अनुभवले. एकदा एका प्रेताच्या बरोबर आलेल्या नातेवाईकांनी त्यांच्या दुकानातुन वस्तू घेतल्या आणि त्यांना विचारले की कोणी अंत्यसंस्कार करतील का मृतदेहावर? आमच्या पैकी कोणी तयार नाही. त्या वेळा ताई म्हणाल्या, कोणी कशाला मीच करते की आणि त्यांनी त्या मृतदेहाला तूप लावले आणि विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यावेळी तिथे आलेल्या नातेवाईकांनी ताईंना नमस्कार केले आणि बक्षिस दिले. त्यादिवशी पासून सुरू झाली एक आखंड अविरत मृतदेहाचे सेवा व्रत.

 कॅन्सरने गेलेले रुग्ण यायचे त्यांची त्वचा हातात यायची, तर जळून गेलेल्या रुग्णाचे अवयव हातात यायचे, कधी कधी एकच दिवशी १० पेक्षा जास्त मृतदेह समोर यायचे पण तरीही तेवढ्याच सेवाभावी वृत्तीने सुनीता अखंड सेवा द्यायची. अमरधामचे नाव काढले तरी चांगली माणसे तिथे जायला घाबरतात मात्र सुनीता ताई गेली १५ वर्ष अष्टोप्रहर, तिन्ही त्रिकाळ मृतदेहाची सेवा करण्याचे काम करीत आहेत.

कोरोना काळात तर अनेक फोन त्यांना यायचे की आमुक-तमुक हॉस्पिटलमधून तुम्ही मृतदेह घेवून जाल का? आम्ही तुम्हाला पैसे देतो. दोन मृतदेहा बरोबर आलेल्या नातेवाईकांनी त्यांना अंत्यसंस्कार करावयास सांगितले आणि स्वतः दूर झाले. सुनीता ताईंनी त्या दोनही मृतदेहाची सेवा केली. नेहमीच्या समर्पण भावनेने आणि दोन दिवसांनी त्या डेडबॉडीचे मृत्यूचे दाखले आले तर दोनही व्यक्ती कारोनाने मृत झालेले. सुनीताताईंना घरच्यांनी खुप रागावले, पण ताई म्हणाल्या मी देवाचे काम केले मला काही होणार नाही आणि झालेही तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ताई तयार देवाचे काम करायला. कोरोना काळात अनेक मोठ्या थोरल्या माणसांनी त्यांना नमस्कार केले. शतशः आभार मानले पैसे दिले त्यावेळी मोठी पेपर बाजी झाली की ताई पैसे घेतात म्हणून पण ताईंनी कधी कोणाजवळ स्वतः पैसे मागितले नाही हे समाजानेच सर्वांना सांगितले. लोकांनी स्वतः त्यांना खुशीने पैसे दिले आणि ते त्यांनी नाकारले नाही. सुनिताताईंना सर्व समाजाच्या अंत्यविधीच्या पद्धती, रूढी-परंपरा माहिती आहेत त्याप्रमाणे त्या मृतदेहाला सेवा देतात आणि याच त्यांच्या वेगळ्या सेवेला शासनाने “हिरकणी पुरस्काराने” सन्मानित केले आहे. तसेच “अटल सेवा गौरव पुरस्कार”, “सावित्री बाई फुले सन्मानाने” गौरविले आहे. 

एकविसाव्या शतकात आजही अनेक समाजात महिलांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही. तिथे ही महिला सकाळ, दुपार, रात्र, पहाट असे अहोरात्र सेवाव्रत करत आहे. या व्रताला आमचा मानाचा मुजरा .

“अंतिम प्रवास सुकर करत आहे तिला तिच्या व्रताला मानाचा मुजरा”


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational