Swarupa Kulkarni

Abstract Others

3  

Swarupa Kulkarni

Abstract Others

अंगण

अंगण

2 mins
28


     कोकणातली ती लाल माती...जवळच निळा निळा समुद्र......आकाशही निळेच पण तरीही समुद्राचे निळेपण जपणारे.....जवळच नारळी- पोफळीच्या बागा..केळी- सुपारीच्या रांगा..खाऱ्या वाऱ्याची किनाऱ्याला जुनी सवय!.. जवळच भातशेतीची लगबग..उन्हाळा घामाघूम करणारा तर पावसाळा यथेच्छ चिखल करणारा..हिवाळ्यात तर निसर्ग गोठवून टाकणारा...खरंच निसर्गाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे कोकण..!!

    या कोकणातली घरही फार सुरेख ...उतरत्या छपरांची,ऐसपैस..गोतावळा सहज सामावणारी!..घर मोठंसं, तसं अंगणही भलंमोठं...केळीची कुंपणं ..कोपऱ्यात माडाची उंचच उंच सावली...वाऱ्याने डोलणाऱ्या सुंदर सुंदर फुलांची रेलचेल...जाई-जुई- केवड्याचा अत्तरगंध प्रत्येक सकाळ सुगंधित करणारा...मोठ्या अंगणात तांदळाच्या पिठीने रेखलेली सुरेख अल्पना(रांगोळी)..त्या सारवलेल्या भुईवर ती पांढऱ्यास्वच्छ ठिपक्यांनी रेखलेली अल्पना म्हणजे त्या घरातली समृद्धी व संस्कृती टिकवणारी कलाकुसरच..भोवती चिल्ल्या- पिल्ल्यांचा वावर, ...सांडलवंड करत अंगणात रमलेली बाळं..घरातल्या सुगृहिणींनी रटरटलेल्या भाताचा बाहेर अंगणातही दरवळणारा सुगंध..अहाहा!!!...घरातली वृद्ध मंडळींच्या खोकण्याचा आवाज..पुरूषमंडळींची शेतावर जाण्याची लगबग..समोरच्या राईतुन हळूहळू वर येणारा केशरी सुर्य..त्याची ती केशर पिवळी आभा साऱ्या आसमंतभर फाकलेली नी हळूहळू कौलारू घराच्या छपरावरून अंगणभर पसरलेली ती सकाळ...अहाहा!! ...ती प्रसन्न सकाळ म्हणजे देवघरातल्या श्रीविष्णुंच्या मुखकमलावर पसरलेले स्मितहास्यच जणू..!!.केवड्याच्या पिवळ्या फुलाचा गंध हळूच येऊन मन प्रसन्न करणारा...ती सकाळची सुखद गारव्यातली थंडी अजुनही झोपलेल्या तरूण-तरूणींच्या मनात सुखस्वप्नांची वर्दळ करते..सुर्य जगाला जागं करत असतो तशी अंगणातली वृक्ष-वल्ली तरूण टवटवीत होत जाते..आणि दुपारी हीच वृक्षराजी किंचीत पेंगू लागते..हे नित्याचेच ..

    दिवसभर कष्ट करून राबलेला कोकणी गडी कलणाऱ्या सुर्याच्या साथीने घर गाठतो...तेथे पाय धूऊन घरात प्रवेशतो...अंगणात हळूहळू संध्येच्या पाऊलखूणा रेंगाळत असतात...दिवेलागणीची वेळ होते...तुळशीजवळ मंदपणे तेवणारे दिवे मन शांत करतात..गृहिणी त्यात रमते..परसात गारवा वाढतो..लहान मुलांच्या परवचा ऐकू येतात..दूर मंदिरात आरतीचा झांज ऐकू येतो...तल्लीनतेने आळवलेले सूर आबालवृद्धांना सुखावतात..मग रात्र आपले चांदण्यांचे अंथरून पसरते..चमचमणाऱ्या ताऱ्यांची नक्षत्रांची विणून केलेली शाल पांघरते..जणू सगळ्या जगाला विश्रांतीची ही शाल लपेटते..आपल्या मखमली कुशीत सारे विश्व पोटाशी घेते...

    माणसाला अंगण मोठं हवं होतं ते याचसाठी...सृष्टीचा चाललेला सुखसोहळा भरभरून अनुभवण्यासाठी...मंतरलेली रात्र, पहाटेची काकड आरती,सोनेरी किरणांनी उमलणारा दिवस, दुपारची कामे, संध्याकाळची मावळती किरणे, हे सारं निसर्ग मानव सौख्याचं प्रतिक...

   ते अंगण असतंच हक्काचं, मायेचं ... जिवलगाला घट्ट बिलगावं व पुन्हा कधी वेगळं न होता यावं तसं घर नी अंगण यांचं नातं....चांदोबाकडे बघत आज्जीचा प्रेमाने भरवलेला घास खात  मोठं व्हावं ही माणसाची ओढ.. हवीहविशी वाटणारी पहिल्या पावसाची मृदगंधातली नशा आभाळभर पेरणारी ती अंगणातली मजा परत परत अनुभवता यावी असं माणसाला वाटतंच...

 मानवी संस्कृतीच्या पाऊलखूणा ह्या अंगणातच रूजल्या, फुलल्या व बहरल्या..तो परसातच लहानाचा मोठा झाला .. *घर माणसाला पाहिजेच पण सुखदुःखांच्या गोष्टी करणारं अंगण मात्र त्याला हवंच...मग ते छोटं असो की मोठं तीच घराची शोभा!!*


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract