Swarupa Kulkarni

Inspirational Others

2  

Swarupa Kulkarni

Inspirational Others

'तस्मैश्री गुरवे नमः। '

'तस्मैश्री गुरवे नमः। '

2 mins
87


 "गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय ।

बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥"

   - संत कबीरांची ही वचने बर्याच जणांना माहीत असतील. याचा अर्थ गुरू व प्रत्यक्ष परमेश्वर अर्थात गोविंद जर एकाच वेळी समोर उभे राहिले तर प्रथम कोणाला वंदन करणार? मी तर गुरूंनाच वंदन करेन कारण तेच मला परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता दाखवतात. किती सुंदर ही वचने ज्यात गुरूभक्तीचे महत्त्व सहज शब्दात सांगितले आहे. गुरू या शब्दाचा अर्थ होतो अंधःकार दूर करणारा, जो आपल्या अंतःकरणातला अज्ञानाचा अंधःकार दूर करतो तो गुरू असतो. लौकिक व्यावहारात गुरू आपण करतो. म्हणजे शाळेत जातो मग शिक्षक असतात ते आपले व्यावहारातले गुरू, परंतु, अध्यात्माच्या प्रांतात गुरू कधी केला जात नाही. तो होतो. ही होण्याची प्रक्रिया प्रत्येक गुरू स्वतः साधकाच्या आयुष्यात येऊन करतो. म्हणजेच स्वतः शिष्याला अनुग्रहित करतो. त्यासाठी शिष्याला कुठेही भरकटत जायची गरज नसते. ही खरी गुरूपरंपरा. अध्यात्मात साधकाला मुक्तीच्या दिशेने नेणार्या गुरूला "सद्गुरू " असे संबोधन वापरले जाते.कारण हा गुरू शिष्याला अंतिम सत्याच्या दिशेने अग्रेसर करतो. हीच सद्गुरूची खासियत आहे की त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. प्रत्यक्ष भगवंतही नाही. सद्गुरू शिष्याची पूर्ण जबाबदारी घेतो. त्याची लौकिक व पारमार्थिक जडणघडण तो स्वतः ठरवतो. तो सत्शिष्यासाठी काहीही करायला तयार असतो. अगदी त्याचे भाग्यही बदलतो. जो पूर्ण शरणागत भावाने स्वतः सद्गुरूला शरण जातो त्याचे सर्व व्यावहार सद्गुरूच ठरवतात. ही अनन्य होण्याची कला ज्याला साधली तो मोक्षाला विनासायास जातो. ही सद्गुरू भक्तीची फलश्रुती आहे. 

    परमेश्वर भक्ताचा सांगाती असतो नाही असं नाही परंतू सद्गुरू हा शिष्याला मार्गदर्शन करतो, वेळोवेळी सुचना देऊन अनुचित गोष्टींपासून रोखतो. परमेश्वर आपला जन्मदाता असेल पण मुक्तीदाता सद्गुरूच असतो. जगनियंत्याने स्वतः राम, कृष्ण अवतारात हेच दाखवून दिले. श्री रामाने वसिष्ठांना गुरू केले, श्री कृष्णाने संदिपनींना गुरूदेव पद दिले. ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. आपण ज्ञान देणार्या व्यक्तीला सर्वोच्च सन्मान देतो. कारण गीतेतही म्हंटलंय, न ही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। ज्ञानाइतके पवित्र या जगात दुसरे काहीच नाही. तसेच हे ज्ञान देणारा परमपवित्र असतो हेही सांगितले गेलेय. महादेवांपासून चालत आलेली ही परम पावन परंपरा आजही आपण साजरी करतो. व्यासोच्छिष्ठं जगत्सर्वम् असे म्हणतात त्या महर्षी व्यासांच्या विशाल ज्ञानभंडाराला नमन म्हणून त्यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आज प्रत्येकाने मनोमन पुजलेल्या आपल्या गुरूंना, सद्गुरूंना वंदन करून अत्यंत आदरपूर्वक विनंती करावी की 'हे गुरूदेव, माझ्या आयुष्यातील वाईट गोष्टींचा, अज्ञानाचा विनाश कर. मला पोटाशी घे व उरलेले आयुष्य तुझ्या कृपाशीर्वादाने बहरू दे. त्यात माझा चहूबाजूंनी विकास होऊ देत. मी तुझे लेकरू गुरूमाऊली. चुकले तर चुका पोटात घे व माझा उद्धार कर. माझ्यावर तुझे लक्ष अखंड राहू देत. 

   

    गुरूरब्रह्मा गुरूरविष्णू गुरूरदेवो महेश्वरः। 

गुरूरसाक्षात परब्रह्म, तस्मैश्री गुरवे नमः।।


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational