Swarupa Kulkarni

Inspirational Others

2  

Swarupa Kulkarni

Inspirational Others

भक्तीमार्ग

भक्तीमार्ग

3 mins
25


    सकाळची प्रसन्न वेळ ...सडारांगोळीने शृंगारलेले अंगण...त्या अंगणातील तुळशीच्या पवित्र वृंदावनाजवळ समर्थांसारखा तेजःपुंज,वैराग्यसंपन्न, योगिराज जेंव्हा मेघासारख्या करूणगंभीर स्वरात मनाच्या श्लोकांची साद घालत असेल तेंव्हा आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती स्वधर्माच्या स्वाभिमानाने,आत्महिताच्या प्रेरणेने खडबडून जागा होत असेल आणि त्याचबरोबर कोणत्याही त्यागाला सिद्ध होत असेल.

   समर्थांनी निर्मिलेले मनाचे श्लोक किंवा मनोबोध किंवा मनाची शते हे भूजंगप्रयात वृत्तात आहेत.प्रत्येक ओळीत १२ अक्षरे व ४ य गण असतात.३ अक्षरांच्या गटाचा एकेक य गण असतो.या रचनाविशेषामूळे भूजंगप्रयातातील काव्याला एक आकर्षक खटका,ठेका व ताल प्राप्त होतो.त्यामुळे ऐकणाराही विशेष प्रभावीत होतो.समर्थांचे हे मनाचे श्लोक २०५ असून समर्थांनी यात मानवी मनाला ईशचिंतनाचा महत्वाचा उपदेश केला आहे.तसेच यात भक्तीमार्ग निवेदिला आहे.

     "मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः।।" असे शास्त्रकार सांगतात,तसेच गीतेतही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मनावर नियंत्रण कसे मिळवायचे याचे उपदेश करतात.समर्थ हे थोर विचारवंत सुद्धा असल्याने ते जाणतात की मन हे मुळातच सात्विक गुणांचे बनलेले आहे.परंतू मोहमायेत विकारग्रस्त होऊन ते विषय विकारात गुरफटलेले आहे.त्याला योग्य मार्गावर आणन्यासाठी समर्थांनी "हे सज्जन मना" अशी साद त्याला घातली आहे.मन कितीही विषयलोलूप असो पण त्याला त्याचे हित सांगितले की ते वळते हे समर्थांनी सिद्ध केले. मनाची चंचलता हा दोष असला तरी एकदा का ते एखाद्या विचारावर लुब्ध झाले की ते कायमचे तिथे चिकटते हे लक्षात घेऊन समर्थांनी ह्या २०५ श्लोकांची रचना केली.

    समर्थ सांगतात की हे सज्जन मना! तू भक्तीच्या वाटेनेच जा.भक्ती मार्गाने गेल्याने तुला आपोआप भगवंताचे दर्शन होईल.मुळात जीव हा भगवंताचाच अंश आहे.परंतू माया किंवा अज्ञानाने आपण भगवंतापासून दूर होतो.हा दूरावा आल्यामुळे मनुष्य दुःख भोगतो.हा दुरावा दूर करायचा असेल तर भक्तीसारखा दुसरा सोपा मार्ग नाही.भगवंतही आपल्या बाळाने आपल्या सन्मुख व्हावे म्हणून नानाप्रकारे आपल्याला वाटा निर्माण करत असतो.गरज आहे त्या वाटा चोखाळायची.ह्या भक्तीमार्गाने गेल्यास भक्ताला आत्मज्ञान प्राप्त होते व तो मुक्त होतो.भज् धातुपासून भक्ती हा शब्द तयार होतो.भक्ती म्हणजे भजन.या भजनाचा अर्थ होतो भगवंताच्या गुणांचे,लिलांचे वर्णन अर्थात प्रेमरस चाखणे होय.भगवंताच्या लीला, गुण, महिमा, रूप ह्यांचे पुनःपुन्हा आठवून व कथन करून त्यांचा रस घेणे म्हणजे भजन!..भगवंताचे रूप,गुण,लीला, महिमा हे खूप श्रेष्ठ असल्याने भक्ताच्या अंतःकरणाची मशागत होते.मन भगवत्प्रेमात तल्लीन होऊन पूर्णपणे सात्विक बनते.असे हे भावविभोर मन भगवंताला आत्यधिक प्रेमाने न्हाऊ घालते.इथे जगाचा प्रपंच सुटून भक्त व भगवंत यांच्यातील प्रपंच सुरू होतो ज्याचे नाव परमार्थ.ही प्रेमगंगा भक्ताइतकीच भगवंताला फार फार प्रिय आहे.भगवंतही युगानुयुगे आपल्या प्रिय भक्ताला भेटण्यासाठी तितकेच उत्सुक असतात.

    भगवंताची भक्ती करत असतांना त्यासाठी योग्य अशी मनाची अवस्था होणे गरजेचे आहे.मन त्या तद्रूप अवस्थेपर्यंत येण्यासाठी मनाला अनेक अडीअडचणीतून मार्ग काढत पुढे जावे लागते.ही एक प्रकारची भक्ताची भगवंताकडे निघालेली अंतर्यात्राच आहे.मनाला परमेश्वर भक्तीचे गूज सांगून समर्थ या २०५ श्लोकात भक्तीचे नाना दाखले,उदाहरणे,उपाय सांगून मनाला त्याचे संसारातील ढोंग बाजूला ठेऊन स्वतःचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी सतत मार्गदर्शन करत आहेत.मनाला लागलेली विषयविकारांची लागण

या भक्तीरसाने दूर पळून जाते.भक्तीरसाचे श्रेष्ठत्व हे तो रस पिणाऱ्यालाच कळते.दूरच्या माणसाला ते कळत नाही.समर्थांनी अतिशय विवेकीपणे भक्ताची परिपक्वता होण्यासाठी मनाला कळवळून उपदेश केला आहे.

   श्रीमद्भग्वत्गीतेत भक्तीयोगात अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रितीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणता अधिक परिपूर्ण आहे? या प्रश्नावर भगवंताने मनुष्याने कर्म करत असतांना भगवंताचे सतत अनुसंधान राखणे अर्थात भक्तीचेच महत्व विषद केले आहे.या भक्तीयोगात भक्तीयोगाचेच परिपूर्ण वर्णन करून शेवटी भगवंत म्हणतात, जे या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्यधिक प्रिय आहेत.

   समर्थ हे अद्वैत वेदांती असल्याने भक्त व भगवंत भक्तितच एकरूप होतात हे तत्वज्ञान मांडले आहे.दासबोधासारख्या ग्रंथातही समर्थ ह्याच अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करतात.भक्त तोच जो भगवंतापासून विभक्त नाही.पाण्याशिवाय मासोळी जशी जिवंत राहू शकत नाही तसेच खरा भक्त भगवंतापासून थोडाही दूर राहू शकत नाही. तुकारामांसारखे संत तर देवाला मोक्षही मागत नाहीत ते मागतात सत्संग...अर्थात भगवत्भजन, भक्तीच! ही खऱ्या भक्ताची परिपूर्ण अवस्था.भक्त हनुमंतालाही चिरंजीवपद मिळालं ते याच कारणास्तव.हनुमंतही रामाला म्हणाले होते,देवा मला तुमच्यासमवेत साकेत धामात यायचे नाही.मला तर जिथे तुमच्या लीलांचे गुणगान चालू आहे तिथेच वास करायचा आहे.नारदांनाही भगवान सांगतात की ,हे नारदा मी योग्यांच्या ह्रदयात नाही,मी वैकुंठातही रहात नाही तर जेथे माझ्या लिलांचे गायन किर्तन होते तेथे मी रहातो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational