Swarupa Kulkarni

Abstract Inspirational Others

2  

Swarupa Kulkarni

Abstract Inspirational Others

दिवाळी आनंदाची

दिवाळी आनंदाची

2 mins
99


    प्रसन्न पहाट...हवेतला गारवा...अवकाशाचा काळा रंग पण त्यावर चांदण्यांची लूकलूकणारी शीतल ,नेत्रदिपक कलाकुसर..घराघरांवर सुंदर लाईटींग..आकाशदिव्यांचे असंख्य रंग व शेड्स...त्यातुन झिरपणारा नितांतसुंदर प्रकाश..दिव्यांची घराघरांवर आरास..मधुनच येणारा फटाक्यांचा आवाज..आकाशात उडणारे रॉकेट्स...खरोखर दिवाळीचे हे पहाटरंग अतिशय मनभावन व सर्वांचे आवडते, हो ना?

    दिवाळीला वसुबारस,गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या सर्व पवित्र उत्सवांची नांदीच असते. हे सर्व उत्सव साजरे करतांना आपल्या संस्कृतीत त्या सणांचे महत्व मानवी जीवनात किती प्रेरणादायी आहे हे सांगून जाते. अत्यंत विचारपुर्वक ह्या सणांची योजना आपल्या पुर्वजांनी केली आहे.

  वसुबारसेला सवत्स गायीचे पूजन ..गुरूद्वादशीचे गुरूस्मरण...धनत्रयोदशीला अमृतकुंभ धारण केलेल्या आयुर्वेदाचार्य धन्वंतरींचे पूजन..नरकचतुर्दशीला नरकासुराचा वध करणाऱ्या गोपाळकृष्णांची आठवण व स्मरण,पहाटेचे अभ्यंगस्नान..लक्ष्मीपुजनाला सागरमंथनातुन प्रगटलेल्या १४ रत्नांपैकी एक असणाऱ्या देवी लक्ष्मीचा प्रगटदिन म्हणून ह्या दिवशी देवी लक्ष्मीचे अत्यंत भव्य दिव्य मंगल पूजन ..बलिप्रतिपदा अर्थात पाडवा या दिवसाला साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मानतात..ह्यादिवशी बायको नवऱ्याला ओवाळते व दिर्घायुष्याची कामना करते..भाऊबीजेला बहिण भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला ओवाळणीत तिच्या आवडती वस्तू भेट देतो..अशा तऱ्हेने हरएक दिवस सुखाची,आनंदाची,सौख्याची उधळण करत येतो..घराघरात गोड मिठाई, चकली,शेव, चिवडा, करंजी, लाडू, अनारसे यांची रेलचेल असते..या दिवसात सगळं कुटूंब एकत्र येऊन हास्यकल्लोळात डुबून जातं..वातावरणातली दिवाळी मनामनातली दिवाळी बनून जाते..ही सुख- समृद्धीची दिपावली मनातील अंधःकार दूर करून आनंदाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवते..तन मनात उल्हास,जल्लोश भरून टाकते..हा चैतन्याचा सोहळा तनमनात स्फुर्ती जागृत करतो..देहरूपी मंदिरात आत्माराम जसा गाभाऱ्यात प्रकाशमान असतो तसा ह्या संपूर्ण सृष्टीचा आत्मा असलेला तो परमात्मा जणू प्रकाशाचे किरण पसरवून त्याच्या अस्तित्वाची स्पंदने निर्माण करतो..चराचरात प्रकाशाची, चैतन्याची, उर्जेची उधळण करत हा सण मानवी जीवनात सौख्याची पहाट घेऊन येतो..ज्ञानेश्वरांनी सांगितलेला दीपावलीचा सर्वांगसुंदर अर्थ हाच की जेंव्हा ह्या भौतिकातील दिवाळीशी अध्यात्मातील दिवाळीचा समन्वय साधता येईल तेंव्हाच खरीखूरी दिवाळी साजरी होईल..

  परमात्मप्राप्ती करून घेणे हा मानवी जीवनाचा मुख्य उद्देश्य. वास्तविक जीव परमात्मस्वरूपच आहे. पण अविद्येच्या आवरणामुळे हा ज्ञानदीप मंद झालेला आहे. अविवेकाची काजळी त्यावर चढलेली आहे. काजळी साफ केली की दिवा आपल्या मूळ स्वरूपात प्रज्वलित होतोच. तो प्रकाशित करण्याकरता अज्ञानाची काजळी साफ करायची आहे. काजळी साफ झाली की ज्ञान आपोआपच प्रगट होते. काजळी साफ करून ज्ञानदीप प्रज्वलित झाला की ज्ञान चित्तात उदय पावते. मग सर्व भेद मावळतो. 


*जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांचि सूर्य दिवाळी ।*

*कीं येरीही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥५-८६॥*


अशी ही ज्ञानमयी,आनंदमयी दिवाळी सर्व मनामनात साजरी होवो हीच सदिच्छा!!


।।शुभ दीपावली।।


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract