Swarupa Kulkarni

Inspirational Others Children

3  

Swarupa Kulkarni

Inspirational Others Children

सुख कळले..

सुख कळले..

2 mins
14


  माझ्या ओवी नी आर्या खूप लहान होत्या तेंव्हा प्रत्येक ऋतुत त्यांची आजारपणं,औषध-गोळ्या यांनी मनात सतत काळजी दाटलेली असायची. दोघींनाही वाढवतांना पालकत्वाचा कस लागायचा व आजही लागतो. मन नकळत हिंदोळ्यावर बसायचे नी कधी काळाच्या मागे तर कधी काळाच्या पुढे जाऊन विचारश्रृंखलेत अडकायचे. ओवीच्या येण्यामुळे झालेला आनंद आर्याच्या येण्यात कमी नाहीच झाला वाढलाच..पण मनात कुठेतरी मुलगा का नाही झाला ही सल होतीच..भलेही मी ते वरवर दाखवत नसले तरी हा विचार मनाच्या कोपऱ्यात डोकवायचा..त्याचं कारण, मलाही एक सख्खा भाऊ आसल्याने भावा-बहिणीच्या नात्यातली मजा ह्या दोघींना अनुभवता यायची नाही व भाऊबीजेला ओवाळायला भाऊच नयेल तर त्या किती हिरमुसून जातील या विचाराने वाईट वाटायचे. आई म्हणून मुलगा किती मोलाचा हे माझ्या आईवरून मी नेहमी पहात आले होतेच..

   पण जशाजशा दोघी मोठ्या होताहेत मला आई म्हणून फार सुखद अनुभव मिळत गेले. सर्वात महत्वाचं दोघींमधला समजुतदारपणा!! मी फार सुखावले ते ओवी ज्याप्रकारे मोठी बहिण म्हणून आर्याला सांभाळून घेते ते बहिणी-बहिणींचं प्रेम!...ते पहाणं अतिशय गोड असतं...ओवीत सहनशीलता, प्रेमळ स्वभाव, अभ्यासात गती, चांगली स्मरणशक्ती , सांगितलेलं काम ऐकणे हे दुर्मिळ गुण एकत्र आलेले आहेत. त्यामानाने आर्या मला कच्च्या कैरीसारखी वाटते.मधुर नाही तर आंबट गोड! ती मुलाची उणीव सहज भरून काढते.आर्या चटपटीत,हुशार, डोळ्यात खट्याळपणाची चमक, भांडकुदळपणा, विशेषता आजी आजोबांची लाडकी..माझे मात्र बोलणे खाते ,अशी खट्याळ पोरगी...आर्या चुकून मुलगी झालीये असं आमचं सर्वांचं मत झालं...

  काल ओवीला रात्री माझे पाय दाबतांना बघुन मला माझे बालपण आठवले.अशीच तर होते मी भावापेक्षा मोठी म्हणून समजुतदार, प्रेमळ , सर्वांची लाडकी ..

उन्हाळ्यात आईचे पाय उष्णतेने असह्य व्हायचे तेंव्हा मीही तिच्या पायांना खोबऱ्याचे तेल लावून द्यायचे.तेंव्हा आईच्या चेहऱ्यावर दिसणारी कृतार्थता मी अनुभवली होती..आणि आज ओवीकडे पाहिलं की ते तसंच माझ्याही मनात उमटत आहे हे जाणवलं..

  आईला होणारा उन्हाळ्याचा त्रास सेम मलाही होतो म्हणून आता रोज रात्री ओवी तिच्या मृदू- मुलायम नाजूक हातांनी माझे पाय चेपून देते तेंव्हा तिच्या कोमल हातांचा स्पर्श मला खूप भावतो..माझ्यासारखचं तीच्या हातांचा स्पर्श झाला की आर्धं दुखणं पळून जातं..माझ्या पायांची आग असह्य होते म्हणून ती काल थंड पाण्याने रूमाल पाण्यात भिजवून पायांवर ठेवत होती..कितीतरी वेळ..मी शेवटी तिला झोपायला सांगितलं तर म्हणते कशी, आई तुला त्रास होतो ना ,तू झोप मला मज्जा वाटते हे करायला..पण मला माहीत होतं तिच्या डोळ्यात झोप आलेली होती,आईसाठी लेक गार पाण्याचा थंड शिडकाव करत होती..पायांवर की माझ्या मनावर ते मात्र नाही सांगता येणार.. 

    आई मला नेहमी म्हणायची' किती छान पाय दाबतेस गं.. देवबाप्पा तूझं कल्याण करो'..आता तिच्यासारखीच मीही पोरीला त्याच दुवा देते..ओवी, किती गं बाळ माझी गुणाची पोर तू..देवबाप्पा तुझं कल्याण करो...'


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational