मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3.0  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास

नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास

6 mins
398


भाग- चौथा


चैतन्याने भरलेलं घर सँडी पुन्हा एकदा अनुभवत होता. 


नव्या दारातच एकटक बघत उभी होती, तेवढ्यात मुक्ता, अजयची बायको औक्षणाचं ताट घेऊन आली, घरात येणा-या सुखाचं आनंदाने स्वागत होत होत, नव्या ने घरात पाऊल टाकलं, घराला आणि घरातल्या प्रत्येक वस्तूला नव्याने अनुभवत होती. नव्याचे डोळे खूप काही बोलत होते. सँडी आणि ओजस नव्याला च न्याहाळत होते. अचानक तिची नजर तिनेच सजवून ठेवलेल्या त्या तिघांच्या फोटोवर गेली, तिने फोटावर हात फिरवला आणि तोच हात पुढे ओजसच्याही चेह-यावरून ही फिरला. सँडी ने ही झालं गेलं विसरून जा , असं नव्याच्या खांद्यावर हात ठेवत नजरेने च तिला सांगितलं. 


जवळचे काही मित्र , जे आता सँडी-नव्याच्याच कुटुंबाचाच भाग होते , ते ही आनंदाने नव्याच्या स्वागतासाठी हजर होते. नव्या हे सगळं बघून खूश होती. 


सँडी ला हे घर आज परत तीच उब देतय, असं जाणवत होतं. 


नव्या च्या तब्येतीत ही चांगली सुधारणा होत होती. पण सँडीला काही तरी खटकत होते, काय तेच नेमकं शोधण्याचा त्याचा प्रयत्न होता. ते बोलत असतांना ब-याचदा नव्याचे बदललेले एक्सप्रेशन्स त्याला विचारात पाडत होते. काही वेळेला ती शून्यात हरवून जायची, काही वेळेला बोललेल्या गोष्टींचा संदर्भ लागत नसल्याचे भाव चेह-यावर आणायची. सँडीने विचारलं, “काही होतंय का?” , तर,”काही नाही!” , असं म्हणून तिथून उठून दुसरीकडे निघून जायची. 


अशी मनात ठेवणारी नव्या सँडीने कधी पाहिली नव्हती. मग त्याच्या मनात आलं , नुकतीच एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर आलीये, त्यामुळे होत असावं असं. 


माणसाच्या मनाचे व्यापार सहजासहजी समजत नाही. त्याचा तोही सांगू शकत नाही. मग शिक्के मारायची घाई का करायची, असं म्हणतं सँडीने ही लगेच नव्या ला न विचारता, थोडा वेळ द्यायचं ठरवलं.  


आठ दहा दिवस गेले असतील, संध्याकाळी दोघंही वॉकला निघाले. नव्याची घालमेल सँडीला कळत होती. पण नव्या ला सावरायला वेळ दिल्यामुळे सँडी शांत होता. उगाच काही प्रश्न नको ज्याने तिला त्रास होईल, हे सतत सँडीच्या मनात यायचं. 


सँडी-नव्या दोघंही डॉक्टरांकडे रूटीन चेकअप ला निघाले असताना , थोडं बिचकतच नव्याने अखेर सँडी ला सांगितलं की मला काही वेळेला गोष्टींचे संदर्भ लागत नाही , काय झालं होतं मागे ते आठवत नाही , असं वाटत. सँडी साठी तर हा धक्का च होता. पण नव्या हे शेअर करतेय म्हटल्यावर , त्याने तिला धीरच दिला की , “त्यावरही उपाय असेलच, आपण बोलू डॉक्टरांशी , तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल”. 


तशी सँडीला नव्याच्या अैक्सिडेंट नंतर ऑपरेशन च्या वेळी, असं काहीतरी विस्मरण होऊ शकत ह्याची पूर्व कल्पना डॉक्टरांनी दिली होती. 


डॉक्टरांना कडे रुटीन चेकअप च्या वेळी हे विस्मरणाचं सांगितलं , त्यावर ते ही म्हणाले थोडे दिवस आराम झाला की गोष्टी बदलतील. 


४-५ महिने गेले पण गोष्टी विसरणे, काही ओळखीची माणसं स्मरणात न राहणे, काही ओळखीची ठिकाणं कधीच पाहिली नसल्याचे लक्षात येणे, हे सगळं कमी होण्यापेक्षा वाढतच होतं. 


दुस-या कोणत्याही व्यक्तीसमोर आपण बिनदिक्कत उभे राहू शकतो, पण स्वत:ला स्वत: समोर उभं करणं अवघड आणि तेवढंच अशक्य. 


नव्याचं ही असंच काही तरी होत होतं. नव्याची ट्रिटमेंट ज्या न्यूरोलॉजीस्ट कडे सुरू होती, त्यांनी काही प्रमाणात ट्रिटमेंट बदलली. आता ट्रिटमेंट बदलून ही साधारण वर्ष गेले , नव्या ब-यापैकी शांत आपल्यातच राहायला लागली होती. डॉक्टरांशी सतत फॉलोअप सुरुच होता. पण ह्या वेळी तर कहरच झाला. सँडी ऑफिस च्या कामानिमीत्त टूर वर होता. ओजस शाळेत होता , नव्या नेहमी प्रमाणे सूपर मार्केट मध्ये गेली. शॉपींग मध्ये गुंतली आणि तिला वेळेचं भान राहिलं नाही. सामानाचं बिलींग करून निघायची वेळ आली, पण घराचा पत्ताच आठवेना. नव्या कावरीबावरी झाली. खूप प्रयत्न केला आठवण्याचा, मी कोण? हा प्रश्न विचारल्यावर तिचं तिलाच उत्तर मिळत नव्हतं. 


तोपर्यंत इकडे ओजस च्या शाळेची बस ओजसला घर समोर सोडून पुढे गेली. ओजस पाहतो कर काय घराला कुलूप, आई घरी नाही . बराच वेळ वाट पाहत आता संध्याकाळ झाली. मग त्याने ने शेजारीच राहाणा-या अजयकडे धाव घेतली. ओजसने सगळी हकीकत अजयला सांगितली. अजय नव्याच्या शोधात निघाला. आजूबाजूला शोधूनही नव्या सापडत नाहीये म्हटल्यावर त्याने सँडीला कळवलं. सँडीला आलेल्या क्रेडीट कार्डवरच्या मेसेजवरून त्याने सुपर मार्केट चं नावं बघून ज्या ब्रांचवरून हे ट्रान्जेक्शन झालं , तिथे अजयला जायला सांगितलं. अजय तिथे पोहोचला तेव्हा नव्या तिथे एका बाकावर बसली होती , तिला बघताच अजयच्या जीवात जीव आला. अजय तिच्याजवळ आला , पण तिची अनोळखी नजर अजयला जे दाखवत होती, ते त्याला पाहायचं नव्हतं. पण तेच झालं, नव्याने अजयला ओळखलंच नाही. अखेर त्याने तिला सगळं समजवलं आणि घरी घेऊन आला. सँडी ही लगेच घरी परतला. तिच्या बरोबर सतत एक केअर टेकर मावशींना ठेवलं आणि नव्याची ट्रीटमेंट अजून जोरात सुरु केली. 


आता घराची सगळी जवाबदारी सँडीने स्वत: कडे घेतली. ओजस ही खूप समजूदार होताच , परिस्थितीचं भान त्याला ही होताच. नव्याची काळजी घ्यायला त्याने ही सुरूवात केली. 


आयुष्यात जवाबदारीचं ओझं वय बघून खांद्यावर येत नाही , हे मात्र खरं. 


सँडी आणि ओजस आता पूर्ण वेळ नव्याकडेच लक्ष देत होते. 


सँडी अंर्तबाह्य हादरला होता , त्याची नव्या कुठेतरी हरवली होती. खळखळून हसणारी हसूच विसरली होती, घरात चैतन्याने वावरणारी चैतन्य हरवून नुसतीच वावरत होती , उत्साहाचा वाहता धबधबा असावा अशी ती आज नुसतीच संथ पाण्याप्रमाणे अस्तित्व दाखवत होती. मनातलं ओठावर पटकन आणणारी आज शब्दाही ओठात दाबून होती.


सँडी नव्याच्या कॉफी किंवा चहा बरोबरच्या गप्पांमध्ये त्यांच्या लग्नाची वाढलेली वर्ष कधी आली नाहीत. पण आज तो हरवलेला निखळ संवाद सँडीला अस्वस्थ करत होता. 


रोज जोडीदाराला समोर बघणं, त्याच्याशी बोलणं, पण आपण बोललेलं त्याच्या पर्यंत न पोहोचणं, यासारखं दु:ख नाही.


ओजसला नव्या ने दिलेले संस्कार ह्या कठीण प्रसंगी कामी येत होते. स्वत:चा अभ्यास सांभाळून ओजस घराकडे आणि सँडीकडेही व्यवस्थीत लक्ष देत होता, शिवाय नव्याला वेळेवर औषध देणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचं काटेकोर पालन करणे. आजवर जी आई त्याच्याकडे लक्ष देत होती, आज त्याच आईकडे लक्ष देण्यासाठी ओजस तयार झाला होता.


अनुभवातून जे शिक्षण मिळतं, ते शिकवणी लावूनही मिळत नाही, तसाच ओजस आयुष्याच्या ह्या शिक्षणात प्रगल्भ होऊ लागला. 

आणि शालेय शिक्षणातही घवघवीत यश मिळवत, त्याची घोडदौड सुरुच होती. 


आज चौदा वर्षाचा प्रदिर्घ काळ मध्ये लोटला गेलाय . नव्या च्या ट्रिटमेंट साठी बरेच नावाजलले डॉक्टर्स झाले. नव्या मध्ये बराच फरक पडलाय, पण तरीही काही वेळा ती पूर्णपणे ब्लैंक होते. 


ओजस ने मेडिसीन करून त्याने अमेरिकतच रेसीडेंसी करून पुढे एम्.डी. केलाय. आज तो ही न्यूरोलॉजीस्ट म्हणून अमेरिकेत काम करतोय.


सँडी ने ही नव्याची ट्रिटमेंट आणि ओजस चं अमेरिकेतलं वास्तव्य बघता त्याची ट्रान्सफर कैलिफ़ोर्निया त करून घेतली आहे.


ह्या डॉक्टरांच्या ट्रिटमेंटने नव्या मध्ये ९५% फरक दिसतोय, तिघंही खूश आहेत. सँडीला पूर्वीची हसरी, बोलकी नव्या परत अनुभवायला मिळते आहे. आता नव्याचं परत घरावरचं साम्राज्य सँडी आणि ओजस बघून हरवून गेलेत. नव्या म्हणेल तसं तिला फॉलो करणे एवढाच पवित्रा त्यांनी घेतलायं. 


अर्थात् ह्या सगळ्यात ह्या कुटुंबाला अमेरिकेत सतत साथ देणारी ओजसची मैत्रीण ‘सई’, ह्या कुटुंबाचा भाग व्हावी, हि सँडी ओजस ची इच्छा नव्याच्या लक्षात आलीये. तिने सई च्या फ़ैमिली ला घरी बोलावलंय. सँडी ओजस ही तयारच आहेत. 


सईच्या फैमिली ला नव्याने तिच्या आयुष्यात घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि ओघाने सँडी-ओजस ने काय सोसलंय ते ही सांगितलं. 


ओजस -सई ची मैत्री बघता आणि त्यांची ही इच्छा बघता, ह्या दोघांच्या लग्नाला होकार द्यावा, असं नव्याने सईच्या फैमिली समोर तिचं मत व्यक्त केलं आहे.


पुढारलेल्या विचारांच्या सईच्या कुटुंबानेही लग्नाला होकार दिला आणि नव्या-सँडी च्या कुटुंबात परत सईच्या रूपात सुखाने प्रवेश केला .


अनेक वर्षांनंतर चैतन्याने भरलेलं घर सँडी ओजस पुन्हा एकदा अनुभवत होते. 


नव्या ओजस-सई ला घेऊन देवघरात गेली , नव्याने देवा समोर तुपाचं निरांजन लावलं , देवासमोर वाटीत साखर ठेवली आणि हात जोडून घराच्या चिरंतन सुखासाठी, चैतन्यासाठी देवाला प्रार्थना केली. 


नव्या ला जी आनंदानुभूति होत होती, त्यातच त्या घराचं आणि घरातल्या सगळ्यांचं सुख होतं.


आनंद साजरा करण्यास कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते . कारण जो आनंदाचा क्षण ,तोच एक मुहूर्त असतो

समाप्त.... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational